ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

२१ पत्री - भाग ०८ : तुळस

७) तुळस   (Ocimum Sanctum)


" शूर्पकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि।। "

वैशिष्ट्य : 


तुळशीखेरीज विष्णुपूजन नाही. पंढरीच्या विठूरायाला तुळशीपत्रांची तजेलदार माला लागते. तुळस ही कृष्णसखी आहेच पण केरळी नायरांच्या मते तुलसी शिवप्रियाही आहे. ओरिसा व्रतानुसार ती सर्वच देवांचे प्रतिनिधीत्व करते म्हणून यमदूतही तिला घाबरतात.सर्व पूजांमध्ये महत्त्वाचे स्थान असणा-या अश्या या तुळशीस गणपती पूजनात मात्र निषिद्ध मानले जाते. परंतु, वर्षातून एकदा गणेश चतुर्थीस (भाद्रपद शुक्ल चतुर्थीस)भक्तीभावाने गणेशास तुळशीपत्र वाहिल्यास ते त्यास पावन होते व केवळ त्या दिवशीच तुळशीपत्र गणेशास वाहिलेले चालते अन्य दिवशी गणेश पूजनात तुळशी पत्र वर्ज्य असते.


घरीदारी सुखशांती नांदावी यासाठी दारी तुळस लावावी ही श्रद्धा अजूनही जोपासली जाते. हिंदू धर्मातील कुटुंबात अंगणात तुळस लावलेला चौकोनी चौथरा असतो त्याला ‘तुळशी वृंदावन’ असे म्हणतात व तुळशीवृंदावन असणे हे हिंदू धर्माचे प्रतिक समजले जाते. याचेच मणी करुन माळा बनवितात. गळ्यात माळ आहे याचाच अर्थ तुळशीच्या मण्यांची माळ घालून वैष्णव अथवा भागवत धर्माचा मार्ग अनुसरणे. 


तुळस ही परम मंगलमयी, सर्व कामना पूर्ण करणारी, शुद्ध आहे. ती स्वर्ग व मोक्ष देणारी आहे. तुळशी महात्म्यात वर्णन केल्यानुसार –“ तुळशी वृक्षाच्या खालील स्थाने पवित्र व पुण्यदायक होतील. तुळशीवृक्षाच्याखाली सर्व देवांचे आणि तीर्थांचे अधिष्ठान राहील. तुळशीपात्राच्या जलाने जोस्नान करील त्याला सर्व तीर्थांचे स्नान घडेल. श्रीहरीला अमृताने स्नान घातल्यानंतर जेवढे समाधान लाभत नाही तेवढे एक तुळशीचे पत्र वाहिल्याने मिळते. मृत्यूसमयी ज्याच्या मुखात तुळशी जल पडते तो पापापासून मुक्त होऊन विष्णूलोकी जातो. दहा हजार गाईंचे दान आणि एका तुळशीपत्राचे दान सारखेच आहे. तुळशीकाष्ठाची माळ धारण करणाऱ्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. तुळशी-आख्याने ऐकेल तो जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. तुळशीचे वन ज्या ठिकाणी असते त्याच्या परिसरातील कोसभर जमीन गंगेसारखी पवित्र असते. प्रवासाला निघताना तुळशील फेरी घालून मार्गस्थ झाल्यास कार्य सिद्धी होते.”


तुळशीची पूजा केल्याने लग्नातील संकटे नाहीसी होतात. तसेच पतीवियोगाचे दुःख कमी करणे, पती-पत्नीचे मिलन घडवून आणणे हे तुळशीचे ईश्वरदत्त कार्य मानले जाते. रावणाने सीतेला अशोकवनात ठेवले होते तेव्हा सीतामाई तुळशीचे यथोचित चिंतन करीत असे. पार्वतीनेसुद्धा भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी हिमालयावर तुळशीचे रोप लावून त्याची पूजा केली होती.


सर्वसाधारण वर्णन :

तुळस रानावनात असेल तर ती असते कृष्णतुळस आणि नगरात असेल तर ती असते रामतुळस. तुळशीच्या पानांची रचना संमुख असते. दातेरी कडा असणा-या पानांवर तैलग्रंथी असतात, त्या नुसत्या डोळयांनाही जाणवतात. एका अप्रतिम गंधाचे वरदान तुळशीला या ग्रंथींमुळे लाभले आहे. या वासाने एकदम प्रफ्फुलीत वाटते. फांद्यांच्या टोकाशी तुळशीचे फुलोरे येतात. हे फुलोरे म्हणजेच मंजिरी. मंजिरी १२ ते १४ सें. मी. लांब, बी गोलाकार, लहान, चपटे, तांबूस, धुरकट असते.

औषधी उपयोग :

घरगुती उपचारात तुळशीला अनन्य स्थान आहे. तिची पाने सर्दी, पडसे, खोकल्यावर गुणकारी आहेत. दुखणा-या कानात तुळशीचा रस टाकतात. बिया पचनसंस्थेच्या विकारावर गुणकारी आहेत. या सर्व उपचारात महत्त्वाचे आहे, ते पानातील पिवळया रंगाचे उडनशील तेल. त्यामुळेच तुळशीची पाने उष्ण गुणधर्माची आहेत. याउलट तुळशीचे बी मात्र शीतकर आहे म्हणूनच तोंड येणे या प्रकारात तुळशीच्या बीयांची खीर गुणकारी आहे. तुळशीची मातीही औषधी आहे. कीटक दंशावर तिचा लेप उपयुक्त आहे.
कथा :

धर्मध्वज राजाची लावण्यवती  कन्या 'वृंदा' ही उपवर झाली होती. तीने आपल्या पित्याकडे माझे लग्न विष्णूशी लावून द्या असा हट्ट धरला. त्यावर धर्मध्वजाने तिला दैवी वराचा ध्यास सोडून मानवी वर सुचविण्यास सांगितले. परंतु वृंदाने त्यांचे ऐकले नाही. ती विष्णूवनात जाऊन चतुर्भुज विष्णूचे ध्यान व जप करुन लागली. वृंदेने एकचित्ताने एक लक्ष वर्ष उग्र तप केले व त्याच्या प्रभावाने तिला अंतर्ज्ञान प्राप्त झाले.

एकदा वृंदेने भागीरथी नदीच्या तिरावर विघ्नेश्वर गणेशास ध्यानमग्न पाहिले. अंतर्ज्ञानाने तिला गणेश हा विष्णूरुप असल्याचे ज्ञान झाले व ती गणेशावर मोहित झाली. वृंदेने श्रीगणेशाचे ध्यान भंग केले. डोळे उघडताच तो म्हणाला, "हे माते, तू कोण आहेस? माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस? गणेशउपासनेत एकचित्त असणा-याची एकाग्रता भंग करणा-यास नरकात जावे लागते, त्यामुळे पुन्हा माझ्या ध्यानात भंग आणू नकोस" त्यावर वृंदा म्हणाली "मी धर्मध्वजाची कन्या असून नाना तपांनी प्रभावयुक्त आहे, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे  तरी माझा त्वरित स्वीकार कर ". त्यावर गणेशाने तिला समजावले, "मी तुझ्याशी विवाह  करु शकत नाही. विवाह करुन मी मोहपाषात अडकणार नाही. तू तुझ्या तपासम तुल्यबळ असा वर पहा".

गणपतीच्या नकाराने संतापलेल्या वृंदेने, "तू विवाह करशीलच" असा शाप दिला. शापास प्रतिउत्तर म्हणून गणेशाने वृंदेस, "तू वृक्ष होऊन मूढ योणीत पडशील" असा शाप दिला. हा दारुण शाप ऐकताच वृंदा घाबरुन थरथर कापू लागली व तिने गणाधीशाची क्षमा मागितली.

दयावान गणेशाने तिची तपश्चर्या लक्षात घेऊन तिला सांगितले, "देवी तू असुरकन्या म्हणून जन्म घेशील व एका महापराक्रमी असुराशी तुझा विवाह होईल. त्या असुराचा मृत्यू होताच पतिव्रते तू आपल्या देहास चितेच्या अग्नीत त्यागशील व वृक्षरुप तुळस होशील. महाविष्णूस शाप देऊन शिळारुपी शाळीग्राम करशील. त्यानंतर भावी काळात विष्णूची पत्नी म्हणून निरंतर रममाण होशील. माझ्या कृपेने तू धन्य होशील. देवांना तुझी पुत्रपुष्पे सदैव मान्य होतील. अन्य काष्ठासम तुला त्रैल्योक्यात कोणीही मानणार नाही तर तुझ्या काष्ठांच्या माळा सकळ जन गळयात भक्क्तीभावाने घालतील. विष्णूची पत्नी म्हणून मानव तुजला पुजतील. तथापि, मला तू वर्ज्य असशील यात मात्र संशय नाही."



गणेशास वंदन करुन चिंताक्रांत वृंदा वनात तप करण्यासाठी निघून गेली. वृंदा एकचित्त 'गणेश नाममंत्र जपत' तप करत होती. दीड लक्ष वर्षे उलटून गेल्यावर गणेश प्रसन्न झाले व तिच्यासमोर प्रकट झाले. हर्षभरीत वृंदा त्यांना प्रणाम करुन स्तुति स्तोस्त्र गाऊन पूर्वी केलेल्या चुकीची क्षमा मागू लागली. त्यावर गणेशाने तिला वरदान दिले "तू गाणपत्य होशील. वर्षातून एकदा तुला माझ्या पूजेत स्थान मिळेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस तुझे पत्र मला भक्तीभावाने वाहिल्यास ते मला पावन होतील. भाद्रपद शुक्ल चतुर्थीस मला वाहिल्या जाणा-या एकवीस प्रकारच्या पत्रीत तुझ्या पत्रांचाही समावेश असेल व केवळ त्या दिवशीच तुझे पत्र मला वाहिलेले चालेल अन्य दिवशी तुझे पत्र माझ्या पूजनात चालणार नाही."


(संदर्भ : ओंकारगणेशा ब्लॉग ; असे वृक्ष असे देव भाग १ - शा. प्र. दीक्षित ; आपले वृक्ष कुळकथा आणि लोककथा - मनेका गांधी ; बहुगुणी वनस्पती - प्रकाश परांजपे )
नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters