ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

अष्टावतार श्रीगणेशाचे भाग ४ : गजानन


गजानन: स विज्ञेय: सांख्येभ्य: सिद्धिदायक: |
लोभासुरप्रहर्ता वै आखुगश्च: प्रकीर्तिता: || 
(अर्थ : श्रीगणेशाचा गजानन हा अवतार संख्याब्रहृमधारक म्हणजेच असंख्य योग्यांना सिद्धी प्रदान करणारा असुन, लोभासुर संहारक आणि उंदिर या वाहनावर आरुढ असा आहे)


श्रीगणेशाने अष्टावतारापैकी ‘गजानन’ हा चौथा अवतार लोभासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता. 

धनाधिपती कुबेर एकदा शंकर-पार्वती यांच्या दर्शनाकरीता कैलास पर्वतावर गेला. शंकर पार्वतीचे दर्शन घेत असताना देवी पार्वतीच्या सौदर्याने मोहित झाला व तिच्याकडे एकटक पाहू लागला. हे पाहून देवी पार्वती अत्यंत क्रोधीत झाली. तिचा क्रोध लक्षात घेऊन धनाधिपती कुबेर भितीने थरथर कापू लागला. आता आपल्यास देवीच्या क्रोधास सामोरे जावे लागणार या भितीने कुबेर गर्भगळीत झाला व त्या क्षणी त्याच्या शरीरातून एक लोभासुर नामक दैत्य निर्माण झाला. 

लोभासुर हा दैत्य असल्यामुळे तो शंकर-पार्वतीस प्रणाम करुन दैत्यकुळाचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे निघून गेला. लोभासुर अत्यंत पराक्रमी होता. शुक्राचार्यांनी आपणांस दीक्षा प्रदान करावी या हेतूने तो शुक्राचार्यांना विनंती करु लागला. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याच्या विनंतीस मान दिला व त्याला आपले शिष्य बनवून घेतले. शुक्राचार्यांनी लोभासुरास भगवान शंकरांच्या पंचाक्षरी मंत्राची दीक्षा प्रदान केली व शिवकृपा प्रात्प करण्यासाठी तपश्चर्या करण्यास वनात निघून जाण्याचा आदेश दिला. 

गुरुंच्या आदेशाप्रमाणे लोभासुराने वनात जाऊन अन्नपाणी त्याग करुन, अंगावर भस्म धारण करुन शिवशंभोच्या कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. त्याच्या अनंत कालपर्यंत चालणाऱ्या कठोर तपश्चर्येवर भोलेनाथ प्रसन्न झाले व लोभासुराससमोर प्रकट झाले. त्यांनी लोभासुरास वरदान मागण्यास सांगितले. लोभासुराने महादेवांकडून त्रिलोकांपासुन निर्भय होण्याचे वरदान मिळविले. तिन्ही लोकांपासून निर्भयतेचे वरदान प्राप्त होताच लोभासूर उन्मत्त झाला. त्याने सर्व दैत्यांना एकत्र करुन अतुल्य सैन्यसेना तयार केली व तिन्ही लोकांवर आक्रमण केले. पृथ्वीवरील सर्व राजांना पराभूत करुन वर्चस्व प्रस्थापित केले. स्वर्गाकडे आगेकूच करुन इंद्रास पराभूत केले व स्वर्गही काबीज केला. पराभूत इंद्रदेवाने मदतीकरीता श्रीविष्णूंकडे धाव घेतली. श्रीविष्णूंनी दैत्यांविरोधात युद्ध पुकारले. लोभासुर व श्रीविष्णू यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. पण महादेवांच्या निर्भयतेचे वरदान लाभलेल्या लोभासुरापुढे विष्णूंचेही काही चालले नाही. आता लोभासुराने कैलासाकडे कूच करण्याचे ठरविले आणि महादेवांनी आपल्या दूताकरवी निरोप पाठविला, “हे महादेवा, मला आपणाकडून प्राप्त निर्भयतेच्या वरदानाचे स्मरण व्हावे. या वरदानामुळे मी तिन्ही लोकांवर विजय मिळविण्यास सक्षम झालो आहे. तुम्हीदेखील या पराक्रमी लोभासुराशी युद्ध करण्यास सज्ज व्हा अथवा कैलास सोडून निघून जा.” महादेवांना आपण दिलेल्या वरदानाचे सामर्थ्य ज्ञात असल्यामुळे ते कैलास सोडून तपश्चर्येकरीता वनात निघून गेले. 

तिन्ही लोकांवर विजय मिळविल्यावर लोभासुराच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आपण जगजेत्ता झालो या अहंकाराने त्याने सर्वत्र अराजक माजविले. देवदेवता, ब्राहृमण, ऋषिमुनी यांना त्रास देऊन हैराण केले. सगळीकडील धार्मिक यज्ञयाग, पुजा-अर्चना आदींवर अंकुश आणला. सर्व धर्म-कर्म बंद झाले. या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरीता चिंतातूर देवदेवता, ब्राहृमण, ऋषिमुनी हे विश्वामित्रांचे पुत्र, आचार्य रैभ्य यांच्याकडे गेले. रैभ्यमुनींनी सर्वांनी गजाजनाची आराधना करण्यास सांगितले. विघ्नहर्ता श्रीगणेशच या परिस्थितीतून आपणासर्वांनी बाहेर काढू शकतात त्यामुळे सर्वांनी श्रीगणेशाची आराधना करावी, असा सल्ला रैभ्य मुनींनी सर्वांनी दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार सर्वांनी श्रीगणेशाची मनोभावे आराधना केली. त्यांच्या आराधनेवर प्रसन्न होऊन श्रीगणेश उंदरावर स्वार होऊन गजाजन अवतारात प्रकट झाले व त्यांनी सर्वांना लोभासुराच्या त्रासातुन मुक्त करण्याचे आश्वासन दिले. 

लोभासुराने महादेवांची भक्ती करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले व त्यांच्या वरदानामुळेच तो उन्मत्त झाला होता. जगजेत्ता झाल्यामुळे कोणाचेही म्हणणे ऐकून वा समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेला उन्मत्त लोभासुर हा केवळ भगवान शंकरांचे म्हणणे निश्चित ऐकून घेईल या विचाराने गजाननाने लोभासुराशी बोलणी करण्याकरीता महादेवांना विनंती केली. 

गजाननाच्या विनंतीनुसार महादेव लोभासुराकडे आले. लोभासुराने महादेवांना प्रमाण केला. महादेवांनी लोभासुरास गजाननाचा निरोप दिला, “गजाननापुढे तुझा पराजय निश्चित आहे. तू गजाननास शरण ये अथवा युद्धासाठी सज्ज हो.” पुढे महादेवांनी त्यास गजाननाची महती सांगितली आणि त्यास शरण जाणे लोभासुरासाठी कसे कल्याणकारक आहे हेही पटवून दिले. असंख्य योग्यांना सिद्धी प्राप्त करुन देणारा एकमेव मार्ग म्हणजे गजाननास शरण जाणे हा आहे. एवढे सांगून महादेव निघून गेले. 

इकडे दैत्यगुरु शुक्राचार्यांनीदेखील लोभासुरास गजाननास शरण जाण्याचाच सल्ला दिल्ला. लोभासुराने गजाननास शरण जाण्याचा निर्णय घेतला व गणेशस्तुती गाऊन गणेशाची भक्ती करु लागला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गजानन प्रकट झाले. लोभासुराने गजाननाकडे आपल्या अपराधांना क्षमा करण्याची याचना केली. त्यास क्षमा करुन गजाननाने पातालात गमन करण्याचा आदेश दिला. लोभासुर गजाननास वंदन करुन पातालात निघून गेला. लोभासुराने माजवलेले अधर्म, अनिती आणि अत्याचार संपुष्टात आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिन्ही लोकांमध्ये गजाननाचा जयजयकार होऊ लागला.


त्रैलोक्यावर विजय मिळविलेल्या, लोभाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवता व ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या असुराच्या लोभाचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या गजाननास प्रणाम असो!!! 

~*~

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters